मंचर ( वृत्तसेवा ) : आंबेगाव ( जि पुणे ) तालुक्यातील शिंगवे (shingave Manchar)येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंगवे येथील असणाऱ्या गाढवे मळ्यात उत्तम हरिभाऊ गाढवे यांच्या विहिरीचे रिंग टाकण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर रिंगच्या आतील बाजूचे बांबू काढताना काम घेतलेला ठेकेदार विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबधित ठेकेदार हा मृत्युमुखी पडला असून तो राजस्थानचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
छोटू गुज्जर (वय 28 रा. हरीपरा राजस्थान ) असे यामधे मृत्यू झालेल्या कामगार ठेकेदाराचे नाव असून त्यांनी शेतकरी गाढवे यांच्या विहिरीचे रिंग टाकण्याचे काम घेतले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंगवे येथे गाढवे यांच्या विहिरीचे रिंग टाकण्याचे काम छोटू याने घेतले होते. गुरुवारी दुपारी काम पूर्ण झाल्यानंतर रींगच्या आतील बाजूचे बांबू काढण्याचे काम तो करत होता. ते बांबू काढत असताना टोल जाऊन छोटू हा विहिरीत पडला. विहीरीत 25 ते 30 फुटावर पाणी असल्याने तो पाण्यात बुडाला होता. तो पाण्यात पडल्याने एकच आरडाओरड सुरू झाली. याबाबत पारगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. त्याचा शोध घेण्यासाठी विहिरीतील पाणी उपसण्यासाठी मोटार लावण्यात आली. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर त्याला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.