कृषीपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्र

गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; त्वरित पंचनाम्याची मागणी – जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे

बेट भागात गारपीटीने मोठे नुकसान

शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे यांनी केली आहे.
गुरुवारी सायंकाळी सविंदने, कवठे यमाई, मलठण, रावडेवाडी, निमगाव दुडे, वडनेर, फाकटे आदी गावांच्या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले कांदा, गहु पीक काढणीच्या उंबरठ्यावर असताना अक्षरशः भुईसपाट झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा असून गारपीट व वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक बागांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब बागांवरील क्रॉप कव्हर उडून गेले असून फळांनी भरलेली झाडे कोलमडून पडली आहेत. तसेच खरबूज, भाजीपाला व चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावले गेले आहे.
राजेंद्रदादा गावडे म्हणाले की, “एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही आणि दुसरीकडे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.”
वादळाचा वेग इतका तीव्र होता की, अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांबही कोसळले आहेत. त्यामुळे काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राजेंद्र गावडे यांनी केली आहे.

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page