टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे) :
टाकळी हाजी येथील पर्ल कोचिंग क्लासेस मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते उपस्थित होते.
कार्यक्रमात पर्ल कोचिंग क्लासेसचे संस्थापक श्री. सुभाष बेल्हेकर, तसेच शिक्षक सायली घोडे, कुणाल तुपे, अनिकेत भाकरे, आरती बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. चेतन तुपे यांनी प्रास्ताविक करत गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले. तेजस्वी भाकरे आणि पूर्वा भाकरे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, संयम आणि सातत्य याचे महत्त्व पटवून दिले. सुभाष बेल्हेकर सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्वप्न मोठी असली पाहिजेत, पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न अधिक मोठे असले पाहिजेत.”
प्रमुख पाहुणे संजय बारहाते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिक्षण घेताना नम्रता ठेवून गुरुजनांचा आदर करणे आवश्यक आहे. आयुष्यात अनेकवेळा आपल्याला कळत-नकळत अनेकांकडून शिकण्यासारखे मिळते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ChatGPT सारखी AI साधने माहिती देतात, मात्र खरे दिशा देणारे गुरूच असतात. म्हणूनच प्रत्येकाने मार्गदर्शन स्वीकारून जीवनात नंबर वन होण्याचा प्रयत्न करावा.”
कार्यक्रमाच्या शेवटी अनिकेत भाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून शिक्षकांविषयी कृतज्ञता आणि निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुरूंना विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला .