शिरूर : ( वृत्तसेवा )
नाशिक जिल्ह्यातील राहाडी (ता. येवला) ये,थील शिवा दादाभाऊ ठाकरे (वय २८) या युवकाचा टाकळी हाजी (ता. शिरूर) निघोज ता पारनेर येथील कुकडी नदीवरील रांजण खळग्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १० जून) घडली असून गुरुवारी (दि. १२) त्यांचा मृतदेह कुंडात तरंगताना आढळून आला.
ठाकरे कुटुंबीय व नातेवाईक असे सुमारे ८ ते १० जण दर्शनासाठी व पर्यटनासाठी निघोज येथील मळगंगा देवी मंदिर व रांजणखळगे परिसरात आले होते. इतर सदस्यांनी कुंडात स्नान केले असताना शिवा ठाकरे खडकावर बसून होते. त्यानंतर त्यांनी रांजणखळगे पाहण्यासाठी कुंडाच्या काठावर प्रवेश केला असता, पावसामुळे ओलसर व शेवाळयुक्त झालेल्या खडकावरून घसरून थेट कुंडात पडल्यांची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली ..
गुरुवारी दुपारी ४ वाजता शिवा ठाकरे यांचा मृतदेह कुंडात तरंगताना आढळून आला. टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना याची माहिती मिळताच त्यांनी निघोज व टाकळी हाजी पोलिसांना संपर्क साधला. कुंडाचा भाग शिरूर व पारनेर तालुक्यांच्या सीमारेषेवर असल्याने निघोज पोलिसांनी पंचनामा केला .
शुक्रवारी (दि. १३) स्थानिक बचावकार्य तज्ज्ञ शिवदुर्ग मित्र मंडळाचे सुनिल गायकवाड यांच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या प्रयत्नांत मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
ठाकरे कुटुंबीयांनी टाकळी हाजी येथेच अंत्यविधी केला .



