सोनभाऊ गावडे एक तरुणांचे आयडॉल
आदरयुक्त स्मरण : प्रा. सोनभाऊ गावडे सर
आज प्रा. सोनभाऊ गावडे सर यांच्या निधनाला तेरावे वर्ष पूर्ण होत आहे. १६ जून २०१२ रोजी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली, पण त्यांच्या कार्याचा प्रकाश अजूनही आपल्या आठवणीत उजळून निघतो. गावातील लोकांसाठी ते केवळ एक शिक्षक नव्हते, तर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक, समाजसेवक आणि आदर्श नेता होते.
माजी आमदार मा. पोपटराव गावडे यांच्या विचारांचा वारसा प्रा. गावडे सरांनी अत्यंत निष्ठेने जपला. गावाचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल ठेवले आणि पुढे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकसेवेत आपले योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद गटात तरुणांची एक सशक्त फळी उभी राहिली, जी आजही त्यांच्या शिकवणुकीवर आधारलेली आहे.
गावोगाव सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार दिला. वाड्या-वस्त्यांवर रस्ते पोहोचवले, नळपाणी योजना राबवून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. शिक्षणाच्या प्रसारासाठी वाड्यावस्त्यांवर शाळा सुरू करून गावाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश नेण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले.
सरांच्या व्यक्तिमत्त्वात एक आगळा दबदबा होता — पण तो भीतीचा नव्हे, तर आदराचा होता. गावात कुठलाही वाद झाल्यास ते स्वतः पुढे सरसावून तो शांतपणे मिटवत. “गावातल्या कोणत्याही गोष्टीसाठी पोलिस स्टेशनला जाऊ नका, मी आहे ना,” हे त्यांचे बोल आजही लोकांच्या कानात घुमतात.
आज त्यांच्या जाण्याने बेट भागाने एक कधीही भरून न येणारे नुकसान अनुभवले आहे. पण त्यांच्या कार्याची, विचारांची आणि नेतृत्वाची आठवण आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे.
🌼 प्रा. सोनभाऊ गावडे सर यांना विनम्र अभिवादन.
आपले कार्य, आपली शिकवण आणि आपले मोलाचे योगदान हेच आपले खरे स्मारक आहे.
श्री संजय बारहाते ( अध्यक्ष शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ )




